जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 9.30 वाजता पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात पालक व शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

सभेच्या सुरवातीस पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे, उपाध्यक्ष तथा बाल समुपदेशक श्री.मकरंद डबीर, श्री.मोहन सपकाळे, पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे, सौ रमा तारे, सचिव श्री.योगेश सोनजे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.सभेत २०२६-२७ या नव्या शैक्षणिक वर्षाकरिता पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांनी प्रास्ताविक सादर केले, तर पालक-शिक्षक संघाचे चिटणीस श्री. योगेश सोनजे यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते या वर्षी शालांत परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती प्राप्त (N.M.M.S) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन करण्यात आला.

या सभेत जेष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरणा’विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सौ. स्मिता करे यांनी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.या वेळेस सन 2025/26 या आर्थिक वर्षातील जमा खर्च अहवाल मंजूर करणे, गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थांना सहाय्य तसेच वेळेप्रसंगी विद्यार्थांना तात्पुरती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, इ.10 वी मधील विद्यार्थांसाठी सराव परीक्षांचे आयोजन व खर्चास मंजुरी देणे, वर्गावर वार्षिक अभ्यासक्रम पत्रक देणे, शासन निर्देशित समित्यांची कार्यवाही करणे, आदी महत्वाच्या विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी पालकांनी विद्यार्थांशी संवाद साधून शाळा व शिक्षकांच्या संपर्कात राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नूतन कार्यकारिणी जाहीर
या सभेत 2026)27 या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली:
अध्यक्ष: श्री. सचिन देशपांडे (मुख्याध्यापक)
उपाध्यक्ष (पालक प्रतिनिधी): श्री. प्रफुल्ल नामदेव म्हसकर
चिटणीस: श्री. योगेश सोनजे
सह-चिटणीस: सौ. सुवर्णा वंजारी
याशिवाय, शाळेच्या प्रत्येक तुकडीमधून प्रत्येकी एक माता पालक व एक पिता पालक यांची वर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अनेक ठराव मंजूर करून निर्णय घेण्यात आले. या सभेचे सूत्रसंचालन सचिव श्री.योगेश सोनजे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. ए. व्ही. चौधरी यांनी केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
