जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगांव जिल्ह्यात एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील तब्बल १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ७ ऑगस्ट दरम्यान सकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली आहे. आता चोरटे मंदिरांनाही लक्ष करत असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य गेटचे आणि गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंयंडे तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी थेट आतील गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरी झालेल्या ऐवजामध्ये मनुदेवी माता मूर्तीवरील ४०,५०० रुपये किंमतीचा ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि २७ हजार रुपये किंमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री चोरट्यांनी चोरून नेली. तसेच रेणुका माता मूर्तीवरील ४०, ५०० रुपये किंमतीचा ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि २७ हजार रुपये किंमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री चोरट्यांनी लंपास केली. असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

दरम्यान सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी आडगाव येथील रहिवासी आणि शेतकरी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधिकाऱ्यांनी मंदिरात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!