असोदा उड्डाणपूल दुर्घटनेची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल; जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल आणि VUP प्रस्तावांनाही हिरवा कंदील देण्याचे संकेत
जळगाव प्रतिनिधी | महेश माळी
धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासह संबंधित अधिकारी व जबाबदारांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती खासदार स्मिता उदय वाघ यांनी दिली.

घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची ठाम मागणी केली होती. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता.

याच बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दाही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडला. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक आणि नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली. या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
🛑 खासदार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया
“जळगावच्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. निकृष्ट दर्जाच्या कामांवर कठोर कारवाई व्हावी आणि शहराला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील,” असे खासदार स्मिता उदय वाघ यांनी स्पष्ट केले.
