इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे वारंवार आश्वासन देत लैंगिक शोषण केल्याचा आरोप

वैजापूर प्रतिनिधी

सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरूणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून एकाविरूद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना शिर्डी परिसरात घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

आकाश दगू कसबे (रा. डोणगाव ता. वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिर्डी येथील २२ वर्षीय तरुणीची सुमारे वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून आकाश कसबे याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये मोबाईलवर नियमित संवाद सुरू झाला. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्याने आपण एकाच समाजातील असल्याचे सांगून लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून तो तरूणीला लॉजवर भेटण्याचा आग्रह करत होता. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र, लग्नाचे वारंवार आश्वासन दिल्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये ती भेटण्यास तयार झाली. त्यानंतर त्याने शिर्डी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर १५ एप्रिल व ३ मे २०२६ रोजीही त्याच लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मे महित्यात मासिक पाळी न आल्याने गर्भधारणा चाचणी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे समोर आले. याबाबत आकाशला माहिती दिल्यानंतर त्याने लवकरच लग्न करू, अशी हमी दिली.

त्यानंतर तो तरूणीला डोणगाव येथील आपल्या घरी घेऊन गेला. ती तेथे दोन दिवस राहिली. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत त्याने लग्न पुढे ढकलण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने लग्नास स्पष्ट नकार देत तरुणीचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सलग तीन महिने मासिक पाळी न आल्याने तरुणीच्या आईने २४ जुलै २०२६ रोजी तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये ती सुमारे तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तरुणीने आई समवेत वीरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्राथमिक कार्यवाही केली असून, घटना शिर्डी परिसरात घडल्यामुळे पुढील तपासासाठी प्रकरण शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!