पंचनाम्यात अतिक्रमणाचे निष्कर्ष; खुलासा न झाल्यास जेसीबीची कारवाई निश्चित – महिनाभराच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणात अखेर जळगाव महानगरपालिकेने निर्णायक पाऊल उचलले आहे. मनपा मालकीच्या जागेवर कथित नियमबाह्य बांधकाम केल्याच्या आरोपावरून युवा विकास फाउंडेशन संचलित सीताबाई गणपत भंगाळे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, माजी महापौर तसेच शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक विष्णू रामदास भंगाळे यांना १५ दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महानगरपालिकेकडे केलेल्या लेखी तक्रारीतून झाली. तक्रारीची दखल घेत अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार नगररचना विभागाने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. या पंचनाम्यात जागेवर अतिक्रमण झाल्याचे, काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवण्यात आल्याचे आणि काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र पंचनामा पूर्ण झाल्यानंतर अंतिम नोटीस बजावण्यासाठी तब्बल एक महिना लागल्याने मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांनी या विलंबावर तीव्र आक्षेप घेत नगररचना विभाग संबंधितांवर मेहरबान असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मनपाने यापूर्वीही संबंधित संस्थेला दोन नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, बांधकाम परवानगी, न्यायालयीन स्थगिती किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे अंतिम नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम अतिक्रमण मानून ते का हटवू नये, याबाबत १५ दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यास अतिक्रमण विभागामार्फत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित बांधकाम हटविण्याची थेट कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, ॲड. पियुष पाटील यांनी आणखी गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणावर २४ तासांत कारवाई करणारे प्रशासन प्रभावशाली व्यक्तींच्या प्रकरणात महिनोनमहिने विलंब का करते? मनपा आणि संस्थेमधील करारानुसार वाढीव अतिक्रमण आढळल्यास पूर्वसूचना न देता कारवाई करण्याचा अधिकार असताना पुन्हा अंतिम नोटीस देण्यामागचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
