जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२६ शासन निर्देशित “सखी सावित्री” व “विशाखा समितीची”(महिला तक्रार निवारण )स्थापना शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांच्या हस्ते आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्थापना करण्यात आली.

या समितीद्वारे मुला – मुलींना सुरक्षितता, निकोप व समाजपूरक वातावरण निर्मिती, दिव्यांग विद्यार्थांची पटनोंदणी व उपस्थिती याकडे लक्ष देणे, शाळाबाह्य विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, विद्यार्थांच्या भावनिक, बौद्धिक व शारीरिक क्षमताविकास तसेच ताणतणाव मुक्तीसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांचे व पालकांचे समुपदेशन करणे, शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणी करणे, विद्यार्थांचे करिअर व कौशल्य विकास, स्वसंरक्षण यासाठी कार्यक्रम आयोजित करणे, आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे, आरोग्य शिबिर, समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन महिलांच्या समस्या सोडविणे, तसेच विद्यार्थांनी, महिला कर्मचारी यासाठी शाळेतील व शाळाबाह्य वातावरण सुरक्षित, निकोप व मैत्रीपूर्ण प्रस्थापित करणे यासारखे उपक्रम आयोजित केले जातील याबाबत मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ रमा तारे मॅडम यांनी मुलींना वयात येताना बदलणारी मानसिक व भावनिक स्थिती यावर मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ शिक्षिका सौ स्मिता करे यांनी मुलींना येणाऱ्या विविध समस्या याबाबत माहिती दिली. तसेच ज्येष्ठ शिक्षिका तथा “विशाखा समिती प्रमुख” सौ प्राजक्ता गोहिल यांनी विद्यार्थनींना शारीरिक, मानसिक बदलांना सामोरे जाताना येणाऱ्या विविध समस्या यावर समुपदेशन केले. या वेळेस शाळेतील विद्यार्थिनी तसेच महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन “सखी सावित्री समिती प्रमुख” सौ रोहिणी प्रचंड यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सौ पद्मजा जोशी यांनी केले. या शासन निर्देशित समिती स्थापन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडेसर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका सौ रमा तारे मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ संगीता पानट व सर्व महिला कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
