रामेश्वर कॉलनी व परिसरातील नागरिकांची लोकसहभागातून विकसित जागेवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांना निवेदन देत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, व्यायामशाळा, बालकांसाठी खेळण्याची बाग तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या मेहरूण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास असूनही परिसरात आरोग्यदायी व मनोरंजनासाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे.
नागरिकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या गट क्रमांक २५०/१+२/ओपन स्पेस या जागेचा लोकसहभागातून विकास करण्यात आल्याचे नमूद केले असून, याच ठिकाणी आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक, बगीचा, ओपन जिम, व्यायामशाळा तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा उभारण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर रामेश्वर कॉलनी व परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
