जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरुण : पालक-शिक्षक संघाच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘पालक सल्ला व मार्गदर्शन दिवस’ उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमामध्ये पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी, वर्तन तसेच इतर शैक्षणिक बाबींविषयी संबंधित वर्गशिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. पालकांनी आपल्या सूचना व अभिप्राय मांडले, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी नियमित गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे विशेष समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि शिस्त याबाबत पालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच अशा विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी तसेच पालक, शिक्षक आणि शाळा यांच्यात अधिक प्रभावी संवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी सहभागी झालेल्या सर्व पालकांचे आभार मानले. तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘पालक सल्ला व मार्गदर्शन दिवस’ नियमितपणे आयोजित करण्यात येणार असून, नियमित गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!