मेहरुण | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका प्रस्तुत, नूतन मराठा महाविद्यालय, ग्रीनसिटी फाउंडेशन, जळगाव आणि हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या “हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६” च्या तयारीला वेग आला आहे.

येत्या १२ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या या भव्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निलयबाबु शाह व सौ. नलिनी शाह यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

“विद्यार्थीदशेतून हरितसंस्कार” या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार असून विविध पर्यावरणपूरक उपक्रमांच्या नियोजन, जनजागृती आणि अंमलबजावणीत सक्रिय योगदान देणार आहेत.

यावेळी निलयबाबु शाह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, जलसंधारण, स्वच्छता, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून आपल्या कुटुंबात, शाळेत आणि परिसरात हरित संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत, या महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांच्या ज्ञान, कौशल्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे १२ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे सकाळी १०:१५ ते सायंकाळी ७:१५ या वेळेत सर्वांसाठी निःशुल्क आयोजित करण्यात आलेल्या हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ विषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!