सलग दोन दिवसांत ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद :
अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक व चोरीविरोधात जोरदार कारवाई केली आहे. सलग दोन दिवसांत एकूण ७,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*पहिली कारवाई – वडगाव*
वडगाव गाव दरवाजाजवळ पोलिसांनी पहिली कारवाई केली. आरोपी छोटु बाबुराव पाटील (वय ५१, रा. वडगाव) हा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉलीतून (क्र. MH 19 CU 5540 / MH 19 AN 6103) दीड ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना आढळला. त्याच्यावर गु.र.नं. १५०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवून ४,०७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

*दुसरी कारवाई – धानोरा-पारगाव*
दुसरी कारवाई धानोरा ते पारगाव फाट्याजवळ करण्यात आली. विना नंबरच्या जॉन डीअर ट्रॅक्टर व ट्रॉलीतून दीड ब्रास वाळूची चोरी करून वाहतूक करणारा अज्ञात आरोपी पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर सोडून पसार झाला. या प्रकरणी गु.र.नं. १५१/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवून ३,०७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अन्वर तडवी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे हे अनुक्रमे या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.
