मुंबई प्रतिनिधी,

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांकडून धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पोलिसांच्या गाडीत असलेल्या आंदोलक मुलांना पुन्हा या ठिकाणी दिसाल तर खिशात 50-50 ग्रॅम पावडर टाकेन, तुमचं पूर्ण आयुष्य वाया जाईल आणि जामीनही मिळणार नाही असा इशारा या व्हिडिओतून पोलिसानं दिलेला दिसतोय. धमकी देणाऱ्या पोलिसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकारामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

व्हायरल व्हिडिओवरून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधला असून याबाबत पोलिसांकडून सदर पोलिस कॉन्स्टेबल वर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईतही तरुणाई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता दादर येथील शिवाजी पार्क आणि चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात शेकडो विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. हातात निषेधाचे फलक, गुलाबाची फुले आणि चॉकलेट घेऊन त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत केंद्र सरकार आणि पोलिस कारवाईविरोधात आवाज उठवला. मात्र जमावबंदीच्या आदेशानंतरही तरुणाई उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच आंदोलकांना वैतागलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार, मुंबई पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवलं होतं. त्यानंतर समोरच्या सीटवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सदर विद्यार्थ्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्यांनी आपल्या फोनचा कॅमेरा सुरू करून हा सगळा प्रकार चित्रित केला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणताना दिसत आहे की, “परत जर या परिसरात दिसला तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. नाहीतर मी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन. मग जामीनही मिळणार नाही. तुम्हा लोकांमुळे सध्या आम्हाला त्रास होत आहे.”

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!