जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली.

जळगाव : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जळगाव शहरासह जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा परिसरात एकाच वेळी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईत बिअर, दूध, आइस्क्रीम आणि मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तीन ठिकाणच्या छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. याशिवाय स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जामनेरमधील हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला.

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी जळगाव शहरातील हॉटेल्स, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या. तपासणीदरम्यान एका प्रमुख हॉटेलमध्ये स्वयंपाकगृह, अन्न साठवण, स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वच्छतेच्या निकषांचे पालन न होणे तसेच अन्नसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला सुधारणा नोटीस देण्यात आली. प्रशासनाने निश्चित मुदतीत सर्व त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले असून, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

रायपूरमध्ये पान मसाल्याचा साठा जप्त

जळगाव शहरालगतच्या रायपूर परिसरातील एका गोदामावर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आली. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी १३ पाकिटे आणि ३९३ पाऊच जप्त केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व इतर लागू कायद्यांनुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. जामनेर येथे हॉटेल्स व बिअरबारची सखोल तपासणी करण्यात आली.

बिअरमधील अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित निकषांनुसार आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी चार नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याच तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि यापूर्वी सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या एका हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

दूध, आइस्क्रीम, मिठाईचे नमुने तपासणीसाठी

अन्न व औषध प्रशासनाकडून दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात आली. एरंडोल येथून दोन, पारोळा येथून चार आणि चाळीसगाव येथून तीन असे एकूण नऊ दुधाचे संशयित नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच चाळीसगाव येथे विक्रीस असलेल्या आइस्क्रीमचे तीन आणि मिठाईचे दोन नमुनेही विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गुटखाविरोधातील विशेष मोहिमेत मुक्ताईनगर आणि चाळीसगाव येथे मोठी कारवाई करण्यात आली. मुक्ताईनगरात सुमारे ८ लाख २० हजार रुपये, तर चाळीसगावात २ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण १० लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्नसाठवण, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री याबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. निर्धारित मुदतीत सुधारणा न करणाऱ्या हॉटेल्स, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध परवाना रद्द करण्यापासून फौजदारी कारवाईपर्यंत कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सलग तीन दिवस चाललेल्या या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे व्यावसायिक, भेसळखोर तसेच प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया पुढील काळातही सातत्याने सुरू राहतील, असे अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!