जळगाव चोपडा अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

धनोरा (ता. चोपडा) : विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्यासह मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने धनोरा येथील महाजन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, अनोळखी लिंक, बनावट कॉल व सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच-बॅड टच’, POCSO कायदा तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर, तर सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले.

दरम्यान, शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड, टवाळखोरी किंवा असभ्य वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अडावद पोलिसांनी दिला. परिसर पाहणीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या व मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने रेंगाळणाऱ्या २ टवाळखोरांवर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली.

या कार्यक्रमास अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, महिला पोलीस दिव्या मराठे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या व मुलींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर अडावद पोलिसांची करडी नजर असून, अशा अपप्रवृत्तींविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापराबाबत आणि सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!