जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान उत्साहात राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत शाळेच्या वतीने ५०० विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या आईच्या नावाने लावून त्यांचे नियमित संगोपन करण्याची शपथ घेतली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि हरित संस्कार यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगून, “प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेले एक झाड भविष्यात पर्यावरणाचे संरक्षण करणारे मोठे योगदान ठरेल,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सक्रिय सहकार्य केले.
