मेहरुण जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. :

विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘निसर्ग खजिना शोध’ हा अभिनव उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

उपक्रमात विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून शाळेच्या परिसरात विविध प्रकारची पाने, फुले, बिया, औषधी वनस्पती, वृक्ष, पक्षी, कीटक तसेच निसर्गातील इतर घटक शोधण्याचे आव्हान देण्यात आले. प्रत्येक गटाने शोधलेल्या नैसर्गिक घटकांची ओळख करून त्यांचे पर्यावरणीय, वैज्ञानिक व औषधी महत्त्व समजून घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून जैवविविधतेची माहिती दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, जिज्ञासू वृत्ती, संघभावना, संवादकौशल्य आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता विकसित झाली. विद्यार्थ्यांनी शोधलेल्या नैसर्गिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यानंतर “निसर्ग जपू, पर्यावरण वाचवू” हा संदेश देत सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.

शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान देण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेत निसर्गाशी मैत्री करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.

या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पालकांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!