चोपडा प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील.
६७ कोटींच्या पाणी फिल्टर योजनेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
चोपडा तालुक्यातील लासुरसह आठ गावांतील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ६७ कोटी रुपयांच्या पाणी फिल्टर योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी करण्यात आली.

चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत (अण्णासाहेब) सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना साकार होत असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ती वरदान ठरत आहे.

योजनेच्या पाहणीदरम्यान माजी आमदार लताताई सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा दर्जा, तांत्रिक बाबी आणि प्रकल्पाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. “जल हेच जीवन, जल हेच अमृत” या विचाराला अनुसरून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन. यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ३५ लाख रुपयांचा बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे सांडपाणी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी, भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि जलसंधारणासाठी होणार असल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

शुद्ध पिण्याचे पाणी, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन या तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी ही योजना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या विकासकामाबद्दल लासुर ग्रामस्थ, शिवसैनिक, नानासो ए. के. गंभीर मित्र परिवार तसेच परिसरातील नागरिकांनी आमदार प्रा. चंद्रकांत (अण्णासाहेब) सोनवणे आणि माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
