जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेतून प्रभावीपणे दिला.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी घरातून कापडी पिशव्या आणून त्यावर “प्लास्टिकला नकार – कापडी पिशवीचा स्वीकार”, “माझी पिशवी, माझी जबाबदारी”, “पृथ्वी वाचवा, प्लास्टिक टाळा”, “Go Green, Keep Earth Clean” यांसारखे पर्यावरणपूरक संदेश आणि आकर्षक चित्रे रेखाटली. त्यानंतर या सर्व पिशव्यांचे ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या स्वरूपात सुंदर प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांची कल्पकता, कलात्मकता आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.

यावेळी विद्यालयाच्या पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना “प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार” अशी पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. दैनंदिन जीवनात कापडी व पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करण्याबरोबरच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून समाजातही प्लास्टिकमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली असून, प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळाली. प्रदर्शनाला शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रूपाली आव्हाड व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!