अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

देवळाली प्रवरा, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बागायत पीक सोसायटीनजीक अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गुहा परिसरासह देवळाली प्रवरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास देवळाली प्रवरा शहरातून गुहा गावाकडे दुचाकीवरून जात असलेल्या गणेश राजेंद्र जाधव,वय २६, रा. गुहा, ता. राहुरी यांना बागायत पीक सोसायटीनजीक अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गणेश जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने जखमी गणेश जाधव यांना राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी गणेश जाधव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मयत गणेश जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गणेश यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!