जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने “रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
वाढती पाणीटंचाई आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पावसाचे पाणी साठविणे, त्याचे संकलन करणे आणि जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

पर्यावरण समितीचे अध्यक्ष कृपया आव्हाड यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे उपाय आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना समजावून सांगितली. तसेच शाळेतील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी “पाणी अडवा, पाणी जिरवा” व “थेंब थेंब पाणी, जीवनाची कहाणी” अशा घोषणांद्वारे जलसंवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण झाली.
मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षक निलेश पवार, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
