चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहर पोलिसांनी अवैध सावकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची पिळवणूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील एका तक्रारदाराने वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी संबंधित आरोपींकडून वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैसे घेतले होते. मात्र घेतलेल्या रकमेपेक्षा अनेक पटींनी अधिक व्याजाची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून वारंवार फोन करून, घरी जाऊन तसेच प्रत्यक्ष भेटून पैशांसाठी दबाव टाकण्यात येत होता. शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक छळामुळे तक्रारदार गंभीर तणावाखाली गेला होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या कारवाईमुळे अवैध सावकारीच्या माध्यमातून नागरिकांचे आर्थिक शोषण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. योगेश्वर किशोर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!