चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहरात दर्जेदार व मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून विकासकामांना गती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नारायणवाडी परिसरात लवकरच सुरू होणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामाची लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत श्री. सचिन रविंद्र पाटील उपस्थित होते. प्रस्तावित रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करताना नगराध्यक्षा पाटील यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, डीवायएसपी कार्यालयाजवळ नुकतेच पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी करून कामाच्या दर्जाची काटेकोर तपासणी केली. विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

“शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक विकासकाम हे नागरिकांच्या विश्वासाशी जोडलेले असून, गुणवत्तापूर्ण कामांद्वारे चोपड्याचा विकास अधिक वेगाने घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन सौ. नम्रता सचिन पाटील यांनी केले.

चोपडा शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळातही विकासकामांची ही गती कायम राहणार असल्याचे संकेत या पाहणी दौऱ्यातून मिळाले आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!