विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित.

जामनेर : जामनेर पंचायत समितीतील विहीर अनुदान योजनेशी संबंधित कथित लाचखोरी प्रकरणात तांत्रिक सहाय्यकाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाभार्थ्याकडून अनुदान मंजुरीसाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळालेल्या एका शेतकऱ्याकडून संबंधित कामाच्या मंजुरीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचून संबंधित कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर ( 32 ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या कारवाईनंतर पंचायत समितीतील देखरेख व नियंत्रण यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामरोजगार सेवक, MREGS अधिकारी, गटविकास अधिकारी (BDO) तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शासनाच्या विविध योजनांमध्ये अशा प्रकारचे गैरव्यवहार होत आहेत का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. तसेच जामनेर तालुक्यातील इतर योजनांमधील तक्रारींचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समितीपासून जिल्हा परिषद स्तरापर्यंत जबाबदारी निश्चित होणार का, तसेच दोषींवर विभागीय कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ACB कडून पुढील तपास सुरू असून, चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!