मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे
घनसावंगी (जालना): जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक धडक कारवाई केली आहे. जमिनीच्या मोजणीचे ‘क’ पत्रक देण्याच्या आणि मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात १२ हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक (सर्वेअर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शेतजमिनीची मोजणी घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आली होती. या मोजणीचे अधिकृत ‘क’ पत्रक मिळवण्यासाठी तक्रारदार गेल्या काही दिवसांपासून कार्यालयाचे चकरा मारत होते. मात्र, संबंधित सर्वेअरने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे १२,००० (बारा हजार) रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जालना यांच्याकडे तक्रार नोंदवली.
एसीबीने रचला सापळा
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने या लाचेच्या मागणीची पडताळणी (वेरीफिकेशन) केली. यामध्ये संबंधित सर्वेअरने १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात एसीबीच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची १२ हजार रुपयांची रक्कम घेऊन सर्वेअरकडे गेले. सर्वेअरने ती रक्कम आपल्या ताब्यात घेताच, दबा धरून बसलेल्या, एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. लाचेची संपूर्ण रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
लाचखोर सर्वेअरला एसीबीने ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे!
कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी न घाबरता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
