जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी ईव्ही कार वापरायला सुरुवात केली आहे. माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय, जरा भान ठेवून वागा, माझ्या शेतकऱ्यांचा जरा विचार करा! सगळ्याच गोष्टी काय पीआर आणि मार्केटिंगसाठी कसे करता? यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या ईव्ही कार घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत. आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या अत्यंत गरजेच्या काळात माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय. त्याला वेळेत वीज मिळत नाहीये. याचा विचार सत्ताधारी करणार आहेत का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

या मंत्र्या-संत्र्यांना काय आहे ? यांना तर कुठंही वीज उपलब्ध होईल, हे बेसुमार वीज वापरतील. पण हा खड्डा माझ्या शेतकऱ्यांच्या सोसावा लागेल ना ! सगळ्यांनीच जर ईव्ही कार वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांनी राज्यात विजेचाही तुटवडा जाणवेल आणि आता ८ तास असणारे लोडशेडींग उद्या १५-१६ तासांवर पोहोचेल अशी भीती व्यक्त करत असताना जरा भान ठेवून वागा, माझ्या शेतकऱ्यांचा जरा विचार करा ! सगळ्याच गोष्टी काय पीआर आणि मार्केटिंगसाठी कसे करता ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!