जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव तालुक्यातील फेसर्डी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत नेत्रतपासणी व योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या विशेष सहकार्यातून जिल्हा परिषद शाळा, फेसर्डी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात गावातील तब्बल ५२ नागरिकांनी मोतीबिंदू तपासणी करून घेत लाभ घेतला. तपासणीदरम्यान ज्यांचा मोतीबिंदू प्रगत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले, अशा रुग्णांवर जळगाव येथील कांताई नेत्रालयात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

मोतीबिंदू हा वाढत्या वयानुसार होणारा सामान्य पण गंभीर नेत्रविकार मानला जातो. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण होतो. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आर्थिक अडचणी किंवा जागरूकतेच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत कांताई नेत्रालयाकडून सातत्याने विविध गावांमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जात असून अनेक रुग्णांना नवदृष्टी मिळत आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही आरोग्यविषयक उपक्रम राबवून सामान्य नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जात आहे. “सेवेतून समाजाशी नाळ जोडणे” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, सरपंच भूषण पवार, किरण पाटील शिवसेना युवा तालुकाध्यक्ष, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, एकनाथ पाटील, कल्पना पाटील, सरला पाटील, उषा पाटील, बारकु पाटील तसेच कांताई नेत्रालयाचे अदनान शेख (ऑप्टोमेट्रिस्ट), योगेश माळी (कॅम्प को-ऑर्डिनेटर) आणि अभिमन्यू पाटील उपस्थित होते.

शिबिरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील हे मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना पुढील उपचार व मार्गदर्शनासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!