जळगांव प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील प्रवज्या फाउंडेशन आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक १६ जून २०२६ रोजी मुक्ताईनगर येथील नागेश्वर भवन येथे हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ४५ जोडपी विवाहबद्ध झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगराज कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा विनोदभाऊ सोनवणे होते. तर उद्घाटन पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे डॉ. अ. फ. भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन एन. जी. शेजोळे, समाधानभाऊ निकम आणि दीपरत्न तायडे यांच्या हस्ते झाले. तसेच धूपप्रज्वलन चेतनभाऊ झनके, विनोदभाऊ सोनवणे आणि गौतमभाऊ प्रधान यांनी केले.

सदर परिणय सोहळा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक ए. टी. सुरडकर गुरुजी यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येत असून काहीजण कर्जबाजारी होतात. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह ही काळाची गरज असून समाजाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ए. जी. तायडे गुरुजी, एस. एस. वले, बी. डी. गवई, मोहन मेढे, युवराज तायडे, उत्तमराव सुरवाडे, मेजर पंडित तायडे, युवराज नरवाडे, श्रीराम पोहेकर, सुपडाताई भालेराव, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोहेकर तसेच विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या बोदडे, सतीश मसाने, जयश्री गाढे, मनीषा गाढे, संजय मगरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवज्या फाउंडेशनचे अध्यक्ष सारीपुत गाढे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक इंगळे व प्रमोद सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे सचिव नितीन गाढे यांनी केले.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
