स्वयंसेवकांची पथके सज्ज; तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षणातून विकासाचे नवे नियोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

जळगाव : जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या सुविधा, उपलब्ध संसाधने आणि सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती मिळविण्यासाठी व्यापक ऑडिट, मूल्यांकन व क्षेत्रीय सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे विविध विभागांच्या समन्वयाने आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीत स्वयंसेवकांची निवड, कार्यशाळा व प्रशिक्षणाचे नियोजन, तालुकानिहाय तसेच शाळानिहाय सर्वेक्षणाची रूपरेषा आणि संबंधित विभागांमधील प्रभावी समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्वेक्षणासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (जि.प. जळगाव), DSU जळगाव (MahaSTRIDE), MSW महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC) तसेच नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची पथके गठित करण्यात येणार आहेत.

निवड झालेल्या स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन शाळा व अंगणवाडी केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देत ऑडिट व क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्राची पायाभूत सुविधा, उपलब्ध सोयी-सुविधा आणि आवश्यक सुधारणांची अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे.

या सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे ज्या ठिकाणी सुविधा अपुऱ्या आहेत, तेथे आवश्यक सुधारणा, मूलभूत सुविधा आणि विकासकामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून नियोजन करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक आणि बालविकास सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची सद्यस्थिती प्रत्यक्ष सर्वेक्षणातून समोर आणून त्यानुसार विकासाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल ठरली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!