- जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

दि. १ — महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून सर्वच क्षेत्रांत भरीव प्रगती करत देशात अग्रेसर स्थान निर्माण केले आहे. राज्य शासन विविध लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, ‘माझी वसुंधरा’ व ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता’ यांसारख्या उपक्रमांतून पर्यावरण संवर्धन व रोजगारनिर्मितीला चालना दिली जात आहे. तसेच २०२७ मध्ये होणारी डिजिटल जनगणना व मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

