जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता दूतांचा दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सन्मान करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, आपले जळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. सण-उत्सवाच्या काळातही स्वतःच्या आनंदापेक्षा शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान खरोखरच अनमोल आहे. शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार म्हणजे आपले सफाई कर्मचारी आहेत.
त्यांच्या मेहनतीचा सन्मान व्हावा, दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही फुलावा आणि त्यांच्या कार्याप्रती आपुलकी व्यक्त करता यावी, या भावनेतून हा छोटासा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
भेटवस्तू स्वीकारताना सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून मन प्रसन्न झाल्याची भावना यावेळी महापौरांनी व्यक्त केली. त्यांच्या कष्टांना आणि समर्पणाला मनापासून सलाम असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी माजी नगरसेवक मनोज काळे, स्वच्छता निरीक्षक सूरज तांबोळी यांच्यासह मान्यवर, नागरिक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी सर्व सफाई कर्मचारी बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना महापौर दीपमाला काळे यांनी दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
