विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री चित्रपटातील प्रसंगाला लाजवेल असा धाडसी दरोडा पडला. शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ घडलेल्या या घटनेत पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले आणि ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.

सुरत येथील पी. उमेशचंद्र अँड सन्स एलएलपी या कुरिअर कंपनीचे कर्मचारी सुनील पटेल आणि शैलेश पटेल हे भोपाळ शाखेतील ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड घेऊन क्रेटा कारने मुंबईकडे जात होते. रात्री १२ ते १ च्या दरम्यान पुलाचे काम सुरू असल्याने ते सर्व्हिस रोडवरून प्रवास करत होते. याच संधीचा फायदा घेत ग्रे रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांची कार अडवली.

लोखंडी पाईप आणि काठ्यांनी हल्ला चढवत दरोडेखोरांनी क्रेटा कारच्या काचा फोडल्या. दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी सोडून देत कारमधील रोख रकमेची बॅग आणि मोबाईल फोन घेऊन दरोडेखोर फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह पाच विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!