विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

यावल : चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून २० वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार गणपती नगर परिसरात उघडकीस आला आहे. रविवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मृत विवाहिता ही मूळची सुरत येथील रहिवासी असून तिचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये यावल येथील फरदीन खान याच्याशी झाला होता. लग्नानंतर ती गणपती नगर येथे सासरी नांदत होती. पती सोलर टेक्निशियन म्हणून काम करतो.

रविवारी दुपारी सासरहून आलेल्या एका फोनने विवाहितेच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीबाबत अशुभ वार्ता कळताच वडील सैय्यद अकबर सैय्यद छोटू हे तातडीने यावलकडे धावले. मात्र, येथे पोहोचताच त्यांना मुलीचा मृतदेह पाहण्याचे दुर्दैव आले.

मुलीच्या मृत्यूबाबत घरात वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. मात्र, वडिलांना घरातील परिस्थिती संशयास्पद वाटली. मुलीच्या अंगावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने त्यांचा संशय अधिकच बळावला. सासरच्या मंडळींकडे जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चारित्र्याच्या संशयातून मुलीला आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गळा आवळून तिचा जीव घेण्यात आल्याची गंभीर तक्रार वडिलांनी यावल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत विवाहितेच्या पित्याने केली आहे. या घटनेमुळे गणपती नगर परिसरात शोककळा पसरली असून यावल शहराचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!