जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव : आरोग्य भारतीतर्फे जळगावात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरातील पर्यावरणप्रेमींच्या साक्षीने विद्यालयाने पर्यावरण प्रकल्प सादरीकरणात राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आरोग्य भारतीच्या या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातून पर्यावरणप्रेमी, पर्यावरण संवर्धक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यशाळेला भारत सरकारचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी आणि देवगिरी प्रांताच्या उपाध्यक्षा डॉ. लीना पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर विद्यालयाच्या विद्यार्थिनी चैताली इंदलकर, अंकिता यादव आणि आरोही सोनार यांनी बाजी मारली. त्यांनी बियाणे संकलन, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, जलसंवर्धन, टाकाऊपासून टिकाऊ निर्मिती, निर्माल्यापासून धूपबत्ती, ई-कचरा संकलन ते फटाकेमुक्त दिवाळीपर्यंत विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.
सादरीकरणाची दखल घेत पद्मश्री चैत्राम पवार यांनी स्वतः स्टॉलला भेट देऊन विद्यार्थिनींकडून प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी फुलांचा गुच्छ न देता वृक्षबियांची भेट देऊन पद्मश्रींचा अनोखा पर्यावरणपूरक सन्मान केला, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुख्याध्यापक मुकेश नाईक आणि पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात बियाणे बँक, वृक्षबिया संकलन व वृक्षारोपण असे सातत्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना कृतीतून पर्यावरण संवर्धन शिकवणे हा यामागचा उद्देश आहे.
या राष्ट्रीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तीनही यशस्वी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. “हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून, विद्यालयात सातत्याने राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक कार्याला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘कचऱ्यातून निर्मिती, बियाण्यांतून हरितक्रांती’ या संकल्पनेतून मेहरूणच्या या शाळेने संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.
