नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे.

रनाळे गावातील पानवाडी परिसरातील क्रमांक ४ येथील वीज वितरण कंपनीच्या डीपीची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, ही डीपी केवळ वीजपुरवठ्यापुरती मर्यादित नसून रनाळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताशीही संबंधित आहे. त्यामुळे डीपीची तोडफोड झाल्याने केवळ वीजपुरवठाच नव्हे, तर ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित यंत्रणेची तोडफोड होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

पोलीस तक्रार दाखल; आरोपींचा शोध घेण्याची मागणी!

या घटनेप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून डीपीची तोडफोड करणाऱ्या अज्ञात आरोपींचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!

महावितरण प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून डीपीची दुरुस्ती करावी आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज असून, आता पोलीस प्रशासन आणि महावितरण विभाग या घटनेवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण रनाळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!