चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील.
अकुलखेडा, ता. चोपडा | दि. ३० ऑक्टोबर २०२६
अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अकुलखेडा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरदार वल्लभभाई पटेल चौक, अकुलखेडा येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा खरा संदेश दिला.
रक्तदान हेच श्रेष्ठदान, या भावनेतून गावातील तरुणांनी, ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. सरदार पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तदान, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शिबिराला माजी सभापती पंचायत समिती चोपडा श्री. सुनिल दगडू महाजन, ग्रामपंचायत सदस्य श्री. अनंत नामदेव महाजन, श्री. संजय काशिनाथ पाटील, श्री. भगवान दगडू महाजन, श्री. अरविंद मधुकर महाजन, स्वप्नील चौधरी, शुभम चौधरी, सरपंच श्री. योगेश दगडू पाटील यांच्यासह इतर सर्व ग्रामस्थ मंडळी अकुलखेडा मोठ्या संख्येने उपस्थित होती.
रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीव गमवावा लागतो. अशा वेळी अकुलखेड्यासारख्या गावातून ३० जणांनी पुढे येऊन रक्तदान करणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच योगेश पाटील व ग्रामस्थ मंडळींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
