विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

लोहारा – पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या एका महिन्यातच परिसरातील तब्बल ५० शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे लोहारा परिसर चोरट्यांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी लोहारा पोलीस दूरक्षेत्रात लेखी निवेदने देऊन तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप चोरट्यांचा छडा न लागल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विहिरीतून पाणबुडी मोटार लंपास

लोहारा येथील शेतकरी प्रताप बळीराम चौधरी यांच्या कासमपुरा शिवारातील गट नंबर ६७/१ मधील शेतातील विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी पाणबुडी मोटार व २२ मीटर वायर चोरून नेली. ही घटना गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी घडली असून यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पगारे हे करीत आहेत.

पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह

लोहारा पोलीस दूरक्षेत्राकडे रात्रीच्या गस्तीसाठी वाहन उपलब्ध असतानाही चोऱ्यांना आळा बसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी देऊनही तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.

या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त तातडीने वाढवावी, परिसरातील संशयित भंगार विक्रेत्यांची कसून चौकशी करावी आणि शेती साहित्य चोरी करणारी टोळी तात्काळ जेरबंद करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागून आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!