जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
पशुवैद्यकीय चिकित्सालय हातेड (ता. चोपडा, जि. जळगाव) अंतर्गत बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी काझीपुरा गावात पशुरोग निदान, उपचार व वंध्यत्व निवारण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या आरोग्याविषयी तपासणी व उपचाराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमादरम्यान चारा साक्षरता आणि संवर्धन अभियानांतर्गत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. वैजयंता टेकाडे (पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी-१, पशुवैद्यकीय दवाखाना, हातेड, ता. चोपडा) यांनी निकृष्ट दर्जाचा चारा सकस बनवण्यासाठी कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच अझोला ही पाण्यात उगवणारी पौष्टिक व स्वस्त जलवनस्पती पशुखाद्य म्हणून कशी वापरावी आणि हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाची माहिती देऊन पशुपालकांना दुग्धव्यवसायात खर्चात बचत करण्याचे महत्त्व पटवून दिले. या शिबिरात शेतकऱ्यांकडून चारा बियाण्याची मागणीही नोंदविण्यात आली.
कार्यक्रमाला काझीपुरा परिसरातील प्रगतीशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जळगावचे जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्थानिक सहकारी व कर्मचारी श्री राहुल बाविस्कर, श्री मनोज महाजन, श्री प्रवीण साळवे, श्री सागर चौधरी व श्री तुषार सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
