जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
नशिराबाद : भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. मकरा फटाक्यांसमोर राख घेऊन जाणारा डंपर आणि गुजरातहून नागपूरकडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकचालक रमेश चंद्र यादव (वय ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाला आहे.
गुजरातहून नागपूरकडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच ४० बीजी ६२८७) रमेश चंद्र यादव चालवत होते. तर दीपनगर येथून जळगावकडे राख घेऊन जाणारा डंपर (क्रमांक एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) मुक्तचर अली चालवत होते. रात्री १० वाजेच्या सुमारास मकरा फटाक्यांसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रकचालक रमेश यादव हे केबिनमध्येच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलवून तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढून जीएमसीत हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातात डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर अडकल्याने जळगाव-भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. महामार्गावर सुमारे ३ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करण्यासाठी सुमारे तीन तास लागले.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
