विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

धुळे तालुक्यातील अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आला. कागदावर ४० विद्यार्थ्यांची नोंद असताना प्रत्यक्ष वर्गात केवळ सातच विद्यार्थी हजर असल्याचे निदर्शनास आल्याने मंत्र्यांनी संताप व्यक्त केला.

मालेगावहून धुळ्याकडे जात असताना भुसे यांनी अजनाळे गावातील पारधी वस्तीतील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. शाळेच्या परिसरात अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या गणवेशाची दुरवस्था आणि अध्यापनाच्या गुणवत्तेतील त्रुटी पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्याध्यापक किशोर परदेशी यांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश दिले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

शाळेच्या पाहणीनंतर भुसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पुढील १५ दिवसांत स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.

मंत्र्यांच्या या अचानक कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, कागदोपत्री आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष उपस्थिती आणि गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!