वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कारवाई आणि प्रत्येक मुद्द्यावर लेखी अहवाल देण्याची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.
जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांवरून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तडवी आदिवासी तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, महिलांवरील कथित लाठीचार्ज, पथसंचलनाच्या मार्गाला देण्यात आलेली परवानगी आणि छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या कथित विटंबनेच्या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीने सखोल चौकशीची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्याचे तसेच घटनांशी संबंधित व्हिडिओ उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पथसंचलनाच्या मार्गावरून प्रशासनाला सवाल
किनगाव येथील पथसंचलनासाठी निवडलेला मार्ग पारंपरिक नसल्याची स्थानिक नागरिकांची हरकत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मशिदीसमोरूनच पथसंचलन नेण्याचा आग्रह धरला गेला होता का, परवानगी कोणी दिली आणि मार्ग निश्चित करताना स्थानिक परिस्थिती व कायदा-सुव्यवस्थेचा विचार करण्यात आला होता का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
पथसंचलनाचा मूळ अर्ज, परवानगी आदेश, मंजूर मार्ग आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अहवाल सार्वजनिक करून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दगडफेकीच्या दाव्याचे पुरावे जाहीर करण्याची मागणी
पथसंचलनावर दगडफेक झाल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडे नेमके कोणते पुरावे आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध व्हिडिओ, छायाचित्रे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांची तांत्रिक पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
तडवी आदिवासी तरुणांवरील गुन्ह्यांची पुनर्तपासणी करा!
या प्रकरणात तडवी आदिवासी समाजातील तरुणांना कथितरीत्या चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यांत गोवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रत्येक तरुणाची भूमिका स्वतंत्रपणे तपासली होती का, गुन्हे दाखल करण्यासाठी कोणते पुरावे वापरण्यात आले आणि उपलब्ध व्हिडिओ व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांची पडताळणी झाली होती का, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
दाखल गुन्ह्यांमागील पुरावे आणि कायदेशीर आधाराची वरिष्ठ स्तरावर पुनर्तपासणी करावी. निर्दोष व्यक्तींवर अन्यायकारक कारवाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार योग्य कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिलांवरील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले?
किनगाव येथील घटनाक्रमादरम्यान महिलांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, त्यापूर्वी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी होती का आणि कारवाई करताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व प्रमाणबद्धतेचे पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करून नियमबाह्य वर्तन आढळल्यास शिस्तभंगाची आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कथित विटंबनेची चौकशी करा
छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या घटनांची अधिकृत नोंद झाली आहे का, व्हिडिओंची तपासणी करण्यात आली आहे का आणि नुकसान किंवा विटंबनेसाठी जबाबदार व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी कोणती कारवाई झाली, याची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावातील सामाजिक एकतेला धक्का लागू नये
किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी हिंदू, मुस्लिम, तडवी, आदिवासी आणि इतर समाजघटकांनी एकत्रितपणे लोकवर्गणी दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. गावातील सामाजिक एकतेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
कोणत्याही समाजाला सामूहिकरीत्या दोषी ठरवू नये, अफवा व धार्मिक ध्रुवीकरण रोखावे आणि सर्व समाजघटकांना समान कायदेशीर संरक्षण मिळेल यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आठ प्रमुख मागण्या; प्रत्येक मुद्द्यावर लेखी उत्तर देण्याचा आग्रह
वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- पथसंचलनाच्या परवानगीपासून लाठीचार्जपर्यंतच्या घटनांची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी.
- तडवी आदिवासी तरुणांवरील गुन्ह्यांचे पुरावे व कायदेशीर आधार तपासावेत.
- महिलांवरील लाठीचार्जचे आदेश आणि त्यातील संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका निश्चित करावी.
- महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कथित विटंबनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- उपलब्ध व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे व पोलीस नोंदी सुरक्षित ठेवाव्यात.
- पथसंचलनाचा अर्ज, परवानगी आदेश आणि संबंधित कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून द्यावी.
- नियमभंग किंवा अन्यायकारक कारवाई आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी.
- निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर झालेल्या कार्यवाहीचा स्वतंत्र लेखी अहवाल द्यावा.
“केवळ चौकशी सुरू असल्याचे सर्वसाधारण उत्तर न देता, कोणत्या मुद्द्यावर कोणती चौकशी झाली, कोणते पुरावे तपासले आणि कोणती कारवाई करण्यात आली, याची स्पष्ट माहिती द्यावी,” अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
किनगाव प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी, पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करणे, या मागण्यांवर वंचित बहुजन आघाडी ठाम असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
