नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांना निवेदन; अनावश्यक खोली वाढविणाऱ्या मशीनधारकांवर कारवाई करण्याची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये बोअरवेल खोदकाम करणाऱ्या मशीनधारकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत, त्यांच्या कामकाजावर नियंत्रण आणावे आणि बोअरवेलची अनावश्यक खोली वाढविण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार, तालुका मुक्ताईनगर यांना उद्देशून नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी बोअरवेलमध्ये सुमारे १०० फूट खोलीवर पाणी लागल्यानंतरही नागरिक व शेतकऱ्यांना २०० फूट किंवा त्याहून अधिक खोलीपर्यंत बोअरवेल खोदण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांवर अनावश्यक आर्थिक खर्चाचा भार पडत असून, भूजलाचा अतिउपसा होऊन जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

बोअरवेल खोदकामासाठी नियमावली लागू करण्याची मागणी

बोअरवेल मशीनधारकांना अधिकृत परवाना देणे, त्यांच्या कामगारांची नोंद ठेवणे आणि बोअरवेल खोदण्यापूर्वी अंदाजे खोली, खर्च तसेच पाणी लागण्याच्या संभाव्यतेबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बोअरवेलची खोली वाढविण्याच्या प्रक्रियेत संबंधित नियमांचे पालन व्हावे आणि आवश्यकतेनुसार संबंधित विभागाची परवानगी व भूजलतज्ज्ञांचा अहवाल घेण्याची व्यवस्था करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

नागरिकांना अनावश्यकपणे अधिक खोल बोअरवेल खोदण्यास भाग पाडणाऱ्या मशीनधारकांवर तातडीने कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक गावातील बोअरवेलची खोली, पाणी लागलेली पातळी आणि संबंधित मशीनधारकांची माहिती नोंदवहीत ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करा

भूजल पातळीचा नियमित वैज्ञानिक सर्वेक्षण करून पाण्याची पातळी अत्यंत खालावलेल्या भागात नवीन बोअरवेल खोदण्यावर नियमानुसार तात्पुरती बंदी घालण्याचा विचार करावा. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारण, शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. याशिवाय, बोअरवेल मशीनधारकांविरोधात तक्रारी नोंदविण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे

पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे बोअरवेलमध्ये पाणी लागल्यानंतरही अनावश्यकपणे खोली वाढविण्याच्या प्रकारांना आळा घालून नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि भूजलाचा अतिउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी मनसे शेतकरी सेनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोडी, गोविंदा ओंकार ठेवलाय आणि उत्तम नारायण जुमळे उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!