नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
जिल्ह्यातील ३५ दिव्यांग बांधवांना अखेर त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळाली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम भैय्या रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत यांनी दिव्यांग बांधवांना शिधापत्रिका मिळावी यासाठी जिल्हाप्रमुख अॅड. रघुवंशी यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत अॅड. रघुवंशी यांनी महसूल विभागाच्या पुरवठा शाखा आणि तहसीलदार कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा सुरू ठेवला.
अजयसिंग राजपूत यांनी सर्व ३५ दिव्यांग लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे जमा करून आमदार कार्यालयात सादर केली. त्यानंतर ही कागदपत्रे पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आली. प्रशासनाने पडताळणीअंती या सर्व ३५ लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका मंजूर केल्या आहेत. या लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्रतेनुसार धान्याचा लाभ मिळणार आहे.
बुधवारी आमदार कार्यालयात नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक पप्पू गिरीसे, शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ठक्कर, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील हिरे, जिल्हा सचिव सदू मराठे, जिल्हा सहप्रमुख राजेंद्र पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष भास्कर कुंवर, शहर सचिव प्रभाकर चौधरी यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
