जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.
रावेर : शासकीय कामाच्या मोबदल्यात लाच मागून २० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७, वनरक्षक, जुनोने बीट, अहिरवाडी परिमंडळ, वनपरिक्षेत्र रावेर) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवार दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदार हे रावेर येथील अर्थमुव्हर्स एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्या परिचित व्यक्तीने रावेर येथील मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहून नेण्याचा परवाना पाटबंधारे उपविभागाकडून घेतला होता. तक्रारदार यांनी आपल्या जेसीबी मशीनद्वारे गाळ काढला होता.
हा परिसर वनरक्षक जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येतो. या कामाच्या मोबदल्यात जगदाळे यांनी जेसीबीसाठी २० हजार रुपये आणि ट्रॅक्टरद्वारे वाहतुकीसाठी ३० हजार रुपये अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. यानंतर तक्रारदाराने २८ ऑक्टोबर रोजी ACB जळगाव कार्यालयात तक्रार दिली होती.
असा रचला सापळा
तक्रारीच्या अनुषंगाने ACB पथकाने रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष पडताळणी केली. यात वनरक्षकाने २० हजार रुपये लाच मागून स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
त्यानंतर रावेर ते बहानपूर रोडवरील एका ज्यूस सेंटरवर सापळा रचून तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जगदाळे यांना ताब्यात घेण्यात आले. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, भुषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांनी केली.
या कारवाईमुळे रावेर वनपरिक्षेत्रातील कामकाजाबाबत जोरदार चर्चा सुरू असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
