आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आक्रमक; PM-JAY, अमृत आहार आणि अंगणवाड्यांबाबत दिले कडक निर्देश
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, दि. २७ ऑक्टोबर २०२६
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि बालकांचे पोषण अधिक सकस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व महिला-बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) विभागाची संयुक्त आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्य आणि पोषणाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
१. मूलभूत सुविधांवर भर : NQAS प्रमाणित प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा १००% उपलब्ध असायलाच हव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच सर्व अंगणवाड्यांमध्ये देखील या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले.
२. आयुष्मान भारतचा लाभ घराघरात : केंद्र आणि राज्य सरकारच्या PM-JAY आणि MJPJAY (महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना) योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्डच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
३. औषधांचा तुटवडा नकोच : कोणत्याही आरोग्य संस्थेत औषधांचा तुटवडा भासता कामा नये, औषधांचा वेळेत आणि मुबलक पुरवठा सुनिश्चित करा, असे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
४. कुपोषणावर थेट वार : SAM (तीव्र कुपोषित) बालकांच्या नियमित आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला. तसेच ‘अमृत आहार’ योजनेतील आहाराचा दर्जा सुधारून बालकांना अधिक सकस, प्रथिनयुक्त आणि पौष्टिक आहार देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल (भा.प्र.से.), जिल्हा शल्यचिकित्सक श्री. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. रवींद्र सोनवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. हरिभाऊ हाके यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदृढ बालके, सक्षम आरोग्यव्यवस्था आणि पोषणयुक्त नंदुरबार हेच जिल्हा प्रशासनाचे अंतिम ध्येय असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
