जळगावात कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक जागर; शिक्षण प्रसारक मंडळाचा स्नेहमिलन सोहळा सुरांच्या बरसातीत रंगल
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शनिवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शेठ ला.ना.सा. विद्यालयाच्या प्रांगणात कोजागिरी स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

संस्थेच्या सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चांदण्यांच्या शीतल प्रकाशात हा सांस्कृतिक सोहळा रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव श्री. अभिजीत देशपांडे, सहसचिवा सौ. मीराताई गाडगीळ, ज्येष्ठ संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रीती देशपांडे, मुख्य समन्वयिका सौ. पद्मजाताई अत्रे, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, सौ. लताताई छापेकर, सौ. रेवती शेंदुर्णीकर, संचालक श्री. कंवरलाल संघवी, श्री. सुरेंद्र लुंकड, श्री. ओम अग्रवाल, श्री. सचिन दुनाखे आदी मान्यवरांच्या हस्ते सुशोभित सरस्वती मातेचे पूजन, भुलाबाई पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी संस्थेच्या शेठ ला.ना. विद्यालय, सौ. प.न. लुंकड कन्या शाळा, ॲड. कै. अ.वा.अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, सौ. सु.ग. देवकर प्राथमिक विद्यालय, सौ. सु.वा. अत्रे विद्यालय, सौ. ज. प्र. कुलकर्णी प्राथमिक विद्यालय या शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर केली.

‘पैंजणाचा नाद आला’ समूहगीत व नाट्य अभिनय, वैयक्तिक गीत, मंगळागौर, ‘आदिमाया अंबाबाई’ समूहगीत, ‘मुरलिया बाजे’, ‘सावर सावर अंबाबाई’, ‘शिक्षकांची अवस्था’ धमाल नाटिका, रामायण-महाभारतातील पुराण गीते, चंद्रावरील गाण्यांचा समूह, हिंदी चित्रपटातील जुन्या मेलोडी गाण्यांचा नजराणा, ‘पल एक पल मे’, ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ नाट्यछटा, ‘या रावजी बसा भावजी’ लावणी नृत्य, ‘मै शायर तो नही’ आणि जीवनातील विविध प्रसंगावर आधारित अभिवाचन असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

शाळेचा परिसर सुंदर रांगोळ्या, कोजागिरीचे महत्त्व सांगणारे आकर्षक फलक लेखन आणि मनमोहक सजावटीने सुशोभित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे नियोजन, आमंत्रण, सुशोभीकरण, स्वागत, सूत्रसंचालन, सादरीकरण, स्नेहभोजन ते समापनापर्यंतची सर्व साखळी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ला.ना. परिवाराच्या एकजुटीतून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये परस्पर स्नेह व संवाद वाढला, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेवती किन्हीकर आणि श्रीमती संपदा तुंबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
