राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत आरोग्यविषयक जनजागृती; वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत उपक्रम

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण, जळगाव : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी गीता देसले, आरती घुगे, सिस्टर योगिता भामरे, संगीता पाटील, साधना बाविस्कर, कविता सोनवणे तसेच आशा वर्कर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना जंतसंसर्गापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे, जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांचे महत्त्व सांगण्यात आले. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

शालेय वयात आरोग्याची योग्य काळजी घेणे, कुपोषणाचा धोका कमी करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यविषयक सवयी अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आरोग्य विभागाच्या पथकाचे आभार मानले. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयी यांना शालेय जीवनात विशेष महत्त्व असून, अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!