जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

मृत तरुणाचे नाव सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला होता.

या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक हाणामारीत झाले. संतापाच्या भरात सुरज वानखेडे याने धारदार शस्त्राने सनीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्याही हाताला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या आहेत.

घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

आई-आजीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

अवघ्या २१ व्या वर्षी नातवाचा असा करुण अंत झाल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयात सनीची आई आणि आजीने एकच टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. तरुण मुलाच्या जाण्याने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!