माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
नंदुरबार प्रतिनिधी :
आयकर भरत असल्याचे कारण दाखवून अनेक नागरिकांची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात असल्याचा प्रकार समोर येत असून, यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व गरजू कुटुंबांवर अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे सहसंघटक तथा नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर मोहन ठाकरे यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
संबंधित नागरिक प्रत्यक्षात आयकर भरत नसतानाही चुकीच्या कारणास्तव त्यांची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात असल्यास, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब, गरजू व पात्र नागरिकांचे रेशन तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही पात्र कुटुंबाला अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही, अशी मागणी सागर मोहन ठाकरे यांनी केली आहे.
पात्र नागरिकांवर अन्याय होऊ नये आणि शासनाच्या अन्नधान्य वितरण योजनेचा लाभ गरजू कुटुंबांना नियमितपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
