जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आज रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा पथसंचलनावरून मोठा तणाव निर्माण झाला. पथसंचलनाच्या मार्गावरून दोन गटात वादाची ठिणगी पडली आणि परिस्थितीचे रूपांतर दगडफेकीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दसऱ्यानिमित्त पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. पथसंचलन एका धार्मिक स्थळासमोरून नेत असताना एका गटाने त्याला विरोध दर्शविला. काही महिला रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्या आणि पथसंचलन त्या मार्गाने नेण्यास विरोध केला.
या वादातूनच काही समाजकंटकांनी पोलिसांवर आणि पथसंचलनावर तुरळक दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून यावल, रावेर आणि भुसावळ पोलीस ठाण्यांचे अतिरिक्त पोलीस बळ किनगावात तैनात करण्यात आले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही संघटना किंवा धर्माची मिरवणूक शांततेत सुरू असताना त्यात अडथळा निर्माण करणे आणि कायदा हातात घेणे चुकीचे असून, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या किनगावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
