वाहतूक कोंडी सोडण्याऐवजी एकाच ठिकाणी उभे राहून दंड आकारला जात असल्याचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर.
शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेल्या हाटदरवाजा चौफुलीवर वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
चौफुलीच्या चारही बाजूंनी येणारी वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे हे वाहतूक पोलिसांचे मुख्य कर्तव्य असताना, प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सहा वाहतूक पोलीस एकाच ठिकाणी उभे राहून केवळ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यामुळे चौकातील गोंधळ वाढत असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यकच आहे, मात्र त्यासोबतच गर्दीच्या वेळी वाहतूक नियोजन करणे, वाहनांना योग्य दिशा देणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
केवळ दंड वसूल करून मूळ समस्येकडे दुर्लक्ष होत असेल, तर या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निष्पक्ष चौकशी करावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिकांना विनाकारण त्रास न देता वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे आता सर्व नंदुरबारकरांचे लक्ष लागले आहे.
