जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर आज सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपासवरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना सुमारे 100 फूट उंचीवरून क्रेन थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात क्रेन चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत चालकाचे नाव मधुकर धनराज पाटील (वय 44, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) असे आहे.

नेमकं काय घडलं?

पाळधी गावाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून तरसोदकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. साईड गर्डरचा मोठा तुकडा क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती पुलाच्या रस्त्यासह 100 फूट खोलवर कोसळली. अपघात इतका भीषण होता की उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

बायपास बनला मृत्यूचा सापळा?
विशेष म्हणजे याच बायपासवर आसोदा गावाजवळही रेल्वे उड्डाणपुलाचा मातीचा भराव कोसळल्याची दुसरी घटना घडली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना मोठ्या कोंडीचा आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या बायपासवरील दुरुस्ती रखडल्याने गेल्या काही महिन्यात तब्बल 12 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. एकाच बायपासवर भराव खचणे आणि आता क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू होणे, यामुळे या मार्गावरील पुलांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि कंत्राटदार कंपनीच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!